| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात होत असलेल्या सेझ प्रकल्पांमध्ये उरण तालुक्यातील भूमिपुत्रांची नोकर भरती केली जावी, अशी आग्रही मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. जर सेझ कंपन्यांमध्ये परप्रांतीयांची भरती केल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना नाईक यांनी सांगितले की, सेझग्रस्त गावांचा नोकर्यांमध्ये पहिला हक्क राहणार आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यानंतर जेएनपीटीग्रस्त आणि नंतर तालुक्यातील बेकारांची भरती होऊ द्या, असे ते म्हणाले. पण जर का उरणमधील किंवा बाहेरच्या पुढार्यांनी बाहेरची भरती केली आहे असे समजल्यास शेकाप तशा पुढार्यांची त्याच्या नावाने जाहीर फलक लावून जाहीर धिंड काढणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
तालुक्यात स्थानिकांचीच भरती व्हायला पाहिजे, असा उरणमध्ये आवाज उठतो आहे. प्रा.एल.बी.पाटील यांनी सेझ भरतीचा जागर आधीच सुरू केला आहेच. नाईक यांची भूमिका प्रत्येक पक्षाने उचलून स्थानिकांनाच नोकर्या हाच अट्टाहास धरल्यास उरण तालुक्यातील एकही तरुण बेकार राहणार नाही. विकास नाईक यांची भूमिका आजपर्यंतच्या शेकापच्या लढवय्या स्वभावानुसार असल्याने कार्यकर्त्यांनी नाईक यांचे अभिनंदन केले. तहसीलदार, जेएनपीटी आणि तेथे येणार्या कंपन्यांना, एजंटांना हा इशारा पोहोचून ते तालुक्याला न्याय देतील, असेही नाईक यांनी सांगितले.