जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिलं सुवर्ण
| बर्लिन | वृत्तसंस्था |
भारताच्या सुवर्णकन्यांना तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर 235-229 असा विजय मिळवला. यापूर्वी या स्पर्धेत भारताला 9 रौप्य व 2 कांस्यपदके जिंकता आली होती. या तिघींनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिरंदाजी चॅम्पियनशिप ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा आयोजित केली जाते.
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत कोलंबियाचा 220-216 असा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये त्यांनी मेक्सिकोचा पराभव केला. ज्योती सुरेखा वेन्नमचा जन्म 3 जुलै 1996 रोजी दक्षिण भारतीय शहर विजयवाडा येथे झाला. तिला लहानपणापासूनच खेळाडू व्हायचे होते. जागतिक क्रमवारीत ती 12व्या क्रमांकावर आहे आणि तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. तिचे वडील माजी कबड्डीपटू आहेत आणि आता विजयवाडा येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. वयाच्या चौथ्या वर्षी ज्योतीने कृष्णा नदी तीन तास, 20 मिनिटे आणि सहा सेकंदात 5 किमी अंतर तीन वेळा पार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. ज्योतीने तिचे शालेय शिक्षण आणि इंटरमिजिएट नालंदा संस्थेतून पूर्ण केले. 16 वर्षीय आदितीने मागील महिन्यात कोलबिया येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड महिला गटात 18 वर्षांखालील विश्वविक्रम मोडला होता. तिने 720 पैकी एकूण 711 गुण मिळवले आणि मागील 705 गुणांचा जागतिक विक्रम मागे टाकला. पटियालाच्या परनीत कौरचे वडील अवतार हे सनौर येथील सरकारी शिक्षक, त्यांनी परनीतला छंद म्हणून खेळ घेण्यास प्रोत्साहन दिले.
सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी मेक्सिकोच्या संघाला 235-229 गुणांनी पराभूत केले. मेक्सिकोकडून दाफने क्विंटेरो, आना सोफा हेरनांडेझ जेओन आणि आंद्रेया बेकेर्रा यांचा समावेश होता. भारताच्या संघाने पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले होते. त्यांनी उपांत्यफेरीमध्ये गतविजेत्या कोलंबियाचा 220-216 गुणांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर भारतीय महिला काम्पाऊंड संघाने तैवान आणि टर्कीचा पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती. भारताने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी 11 पदक जिंकले होती.
मुलींनो, तुमचा अभिमान वाटतो!
भारतीय महिला नवनवीन शिखरे सर करत आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक आहे, पण आश्चर्य नाही. कारण, अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसायचा, तसा या भारतीय कन्यांनी लक्ष्यभेद करत पैकीच्या पैकी गुण कमावले. भारताची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान वाटतो. आमच्या भारताला हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून सुवर्णकन्यांचे कौतुक केले.