। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनतर्फे जुलै महिन्यात आयोजित केलेल्या ‘स्टेट पॅनल क्रिकेट स्कोअरर्स’ परीक्षेत रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै महिन्यात क्रिकेट पंच व गुणलेखक यांच्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन खोपोली येथील महाराजा बैंक्वेट हॉल येथे केले होते. या शिबिरासाठी बीसीसीआयच्या गुणलेखीका केतकी नाईक यांनी रायगडच्या क्रिकेट गुणलेखकांना मार्गदर्शन केले होते. या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील संकेश ढोले, आदेश नाईक, सनी म्हात्रे, रोहन पाटील, राजेश शिंदे, प्रशांत माळी, श्रीकांत पाटील, सुरज देशमुख, गंधर्व इस्वलकर, मंथन पाटील, नरेश दळवी, प्रवीण वानखडे, प्रितेश म्हात्रे, सुरज बेलोसे यांना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत.
एमसीएतर्फे हि पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणार्या 21 जिल्ह्यातील गुणलेखकांनी या परीक्षेत सहभाग घेत परीक्षेचा निकाल ‘अ+’ व ‘अ’ श्रेणीत गुण देऊन लावला गेला. येणार्या 2024-25 क्रिकेट हंगामात रायगडच्या बर्याच गुणलेखकांना एमसीएच्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी गुणलेखना करिता बोलवण्यात येणार आहे. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह आरडीसीएचे सदस्य, खेळाडू व क्रिकेट प्रेमींनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.