। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बेंडसे येथे उल्हास नदीवर असलेल्या पुलाचे कठडे मागील आठवड्यात नदीला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत. या पुलाच्या निर्मिती आधी स्थानिक व्यावसायिक तसेच नागरिक तारेवरची कसरत करून नदी पार करत असत. दरम्यान, या पुलाच्या निर्मितीनंतर तारेवरची कसरत थांबली खरी; परंतु, दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन पुलाचे नुकसान होत आहे. उल्हास नदीच्या महापुरात पुलाचे कठडे वाहून जात असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक झाला आहे.
कर्जत तालुक्यातील जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हासनदीवरील बेंडसे गावाजवळील पूल या भागातील जनतेसाठी जवळचा मार्ग बनला आहे. या पुलाच्या बांधकामामुळे कडाव परिसरातील रहिवाशी आणि नोकरवर्ग यांना भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सहज आणि कमी वेळात पोहचता येते. मात्र, या ठिकाणी पूल नव्हता तेव्हा या भागातील नोकरदार आणि दूध व्यवसाय करणारे लोक तेथे असलेल्या तारेवरून नदी पार करून कामाच्या ठिकाणी पोहचत असत. मात्र, उल्हास नदीला पावसाळ्यात महापूर सदृश स्थिती निर्माण झाल्यावर या पुलावरून सतत पाणी जात असते आणि याचा फटका आजुबाजुच्या गावांना बसतो. यावेळी 14 जुलै रोजी उल्हास नदीला आलेल्या महापूराची तीव्रता एवढी प्रचंड होती की हा पुल तब्बल दहा तास पाण्याखाली होता. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेला कचरा, झाडे झुडपे आणि अन्य वस्तूंमुळे पुलाच्या लोखंडी कठड्याचे लोखंडी पाईप वाहून गेले आहेत. काही ठिकाणी संरक्षण भींतीचे पाईप वाकडे देखील झाले आहेत. अशी स्थितीत या पुलावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या वाहनचालकांसाठी या पुलावरील प्रवास धोकादायक झाला आहे.
14 जुलै रोजी आमच्या तिन्ही गावांना महापुराच्या पाण्याचा वेढा होता. यावेळी पुलाच्या कठड्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास धोकादायक बनला असून वाहन चालकांना पुलाची स्थिती समजून यावी यासाठी बेडसे ग्रामस्थांनी पुलाच्या बाजूला एखादा विजेचा दिवा रात्रभर सुरु ठेवावा.
गणेश धारणे,
स्थानिक रहिवाशी
बेंडसे पुलाच्या कठड्याविषयी माहिती घेण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर तात्काळ त्या ठिकाणी कामे केली जातील आणि पूल सुरक्षित बनवला जाईल.
संजीव वानखेडे,
उप अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग
