। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात मंगळवारी (दि.30) सायंकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम करण्यात आले. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली.
पावसामुळे पोलादपूर-वाई-महाबळेश्वर-सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात दरडीची टांगती तलवार कायम आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली. पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे फाटा येथे मातीचा ओसरा रस्त्यावर आला, तर कापडे ते पायटा दरम्यान मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण कक्ष, पोलादपूर पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठेकेदाराच्या जेसीबीच्या साह्याने दगड, माती व झाड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील दरडीचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







