। अलिबाग । प्रतिनिधी ।
पूर्वीच्या पिढीतील लोकांनी खूप मोठे कर्तृत्व गाजवले. त्यांचे कर्तृत्व पिढ्यान्पिढ्या समाजापुढे येत राहिले. सध्याच्या काळातही अनेक कर्तृत्ववान व्यक्ती नावारूपाला येत आहेत. ते समाजासाठी, देशासाठी कार्यरत राहिले आहेत. अशा व्यक्तींचे काम नवीन पिढीसमोर पुस्तकांमधून येणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी व्यक्त केले.

वर्षा कुवळेकर यांनी लिहिलेल्या ‘सफर खूबसूरत है मंजिल से भी’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वरसोली येथील विठ्ठल मंदिर सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार होते.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरोज वरसोलकर, अश्विनी भिडे, अॅड. निळा तुळपुळे, सुरेखा पाटील, गिरीश तुळपुळे, आनंद कोळगावकर, अॅड. शिरीष लेले, शुभा गाडगीळ, डॉ. चंद्रकांत वाजे आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. वर्षा कुवळेकर यांनी आपल्या साहित्यिक जीवनात विविध विषयांवर लेखन करून उद्बोधन केले आहे. ते तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे, असे अजित पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
वर्षा कुवळेकर यांचे ‘सफर खूबसूरत है मंजिल से भी’ हे तिसरे पुस्तक आहे. त्यांची ‘सावळ्या विठ्ठलच्या देशात’, ‘मागे वळून पाहताना’ ही दोन पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. पुस्तकाच्या लेखिका वर्षा कुवळेकर यांनी आपल्या मनोगतात या पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली. अजित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ऋचा बल्लाळ यांनी सूत्रसंचालन, तर अॅड. पल्लवी तुळपुळे यांनी आभार व्यक्त केले.