। कर्जत । वार्ताहर ।
नेमीची येतो पावसाळा याप्रमाणे फेब्रुवारी, मार्च नंतर कर्जत तालुक्याच्या विविध भागात सातत्याने वणवे लागतात. गेली अनेक वर्षें वणवे लागण्याचे किंवा लावण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. तालुक्यात वणव्यांची मालिका पुन्हा सुरूच आहे. झाडे लावा झाडे जगवाचा नारा देत काही सामाजिक संस्था आणि निसर्गप्रेमी नागरिक पावसाळ्यात स्वखर्चाने वृक्षारोपण करतात. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा रस्त्यांच्या कडेला हजारो झाडे लावली जातात. प्रत्येक सदस्याला काही झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी दिली जाते. त्याप्रमाणे त्यांना कुंपण करून रोज पाणी देण्याचे काम हे सदस्य करतात.
शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागा मार्फत सुद्धा हजारो झाडे लावण्यात येतात.पण कोणीतरी माथेफिरू माचीसची एक काडी पेटवून शेकडो एकरची वनसंपदा नष्ट करतो. तालुक्याच्या प्रत्येक भागात असा एकेक माथेफिरू असावा हे मनाला पटत नाही. त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे. आगी लावणारे खूप मोठे रॅकेट असावे आणि यामागे मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर होत असावी हे उघड सत्य नाकारण्यात अर्थ नाही.
शासनाच्या वनविभागाला इतक्या वर्षात आग लावणारा एकही आरोपी पकडता आला नाही यावर विश्वास बसत नाही. एखाद्या गरीबाच्या झोपडी साठी एखादा वासा आणला तरी वनविभागाची धाड पडते. इतके त्यांचे गुप्तहेर खाते मजबूत आहे. असे असताना हजारो एकरची वने जाळली जात असताना वनखाते शांत का बसते याचा शोध घ्यायलाच पाहिजे असे मत उदय पाटील यांनी व्यक्त केले आहे.