| अलिबाग | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी गुरुवरी दुपारी अलिबागमधील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यांचे कार्यालयासमोर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. शिवसेना कार्यालयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस चित्रलेखा पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा विजय असो अशी घोषणा देण्यात आली. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. दरम्यान, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची अलिबाग शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य शिवसैनिक व शेकापचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दळवींची वेळ संपली : धनंजय गुरव
महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना निवडून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी महिलांनी केलेल्या गर्दीतून आघाडीची शक्ती दाखवून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकाला एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तोच वारसा बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जपला. परंतु, त्यांच्यासोबत शिंदे गटातील नेत्यांनी गद्दारी केली. त्याचे दुःख आज तमाम शिवसैनिकांच्या मनात आजही खोलवर रुजले आहे. गद्दारी करणार्या दळवींची वेळ आता संपली आहे. येत्या निवडणुकीत शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. 23 तारखेला होणार्या मतमोजणीमध्ये हा करिश्मा दिसणार आहे. ‘शिट्टी बजाव, गद्दार हटाव’ या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. चित्रलेखा पाटील एक सुशिक्षित व वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या उमेदवार आहेत. अनेक गरजू शाळकरी मुलींना सायकली देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी खुला केला. या निवडणुकीत शिवसेना पक्षाची संपूर्ण ताकद चित्रलेखा पाटील यांच्या पाठीशी राहणार आहे. शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात चित्रलेखा पाटील यांनी भेट दिल्याने त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा केला आहे, असे प्रतिपादन अलिबाग तालुका प्रवक्ते धनंजय गुरव यांनी सांगितले.
चित्रलेखा पाटील तुमचा विजय नक्की : दळवी
आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या कार्यालयाला चित्रलेखा पाटील यांनी भेट दिली. हे कार्यालय नसून शिवसैनिकांचे एक मंदिर आहे. या मंदिरात चित्रलेखा पाटील आल्या, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यामुळे त्यांचा विजय हा नक्कीच आहे, असे नवशाद दळवी म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे कुटुंब प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात अतिशय चांगले काम केले. त्याची दखल जगानेदेखील घेतली. मात्र, शिवसैनिकांचे आधारस्तंभ असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून शिंदे सत्तेत आले. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचे दुःख शिवसैनिकांमध्ये प्रचंड आहे. या गद्दारांना निवडणुकीत गाढल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नाही. अलिबाग-मुरूडमध्ये भरघोस मते देणार असे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील मुरूड तालुका प्रमुख नवशाद दळवी यांनी ग्वाही दिली.
पूर्ण ताकदीने चिऊताईंना निवडून देणार : शंकर गुरव
महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारासाठी असंख्य कार्यकर्ते जमले आहेत. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीदेखील यामध्ये सहभाग घेतला आहे. मातोश्रीकडून मिळालेल्या आदेशानुसार कार्यकर्ता प्रचाराला उतरला आहे. हा प्रचाराचा झंझावात असाच सुरु राहणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करून चित्रलेखा पाटील यांना बहुमतांनी निवडून देणार, असा विश्वास तालुका प्रमुख शंकर गुरव यांनी व्यक्त केला.
गद्दारीचा बदला घेणार
महेंद्र दळवी यांना शिवसैनिकांचा इशारा
एकनाथ शिंदेंसह अन्य आमदारांनी केलेल्या गद्दारीमुळे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. या कटात महेंद्र दळवी यांचाही सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडून पक्षाचे चिन्ह हिसकावून घेतले. त्यामुळे अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. गद्दारी करणार्यांचा शिवसैनिक नक्की बदला घेणार, असा इशारा यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी दिला.