शेत रस्ते बंद, नदीपात्रात सुरुंग व भराव; संतप्त वाफेघर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगडच्या सुधागड तालुक्यात वाघोशी व वाफेघर गावच्या हद्दीत विकासकाने शेतरस्ते बंद केले आहेत. तसेच येथील नदी पात्रात भराव करून नदीपात्र छोटे केले असून, विनापरवाना सुरूंग लावले असल्याची तक्रार वाफेघर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवारी (दि. 19) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पाली-सुधागड तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, येथील पांडुरंग मोहिते व विलास परुळेकर या विकासकांनी आमच्या वाघोशी हद्दीतील असणाऱ्या शेतांजवळ विकासकाने शेती विकत घेवून प्लॉटींग करून कंपाऊंड घातले आहेत. हे कंपाऊंड करत असताना विकासकाने आमच्या शेतीकडे जाणारे शेतरस्ते आडवले आहेत. आम्ही याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता विकासकाने आम्हाला उलट उत्तरे देवून तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे उत्तर दिले. तसेच आमच्या गावच्या जवळून वाहणाऱ्या नदीपात्रात भराव करून नदीपात्र अरूंद केले आहे. त्यामुळे नदीच्या जवळ आसणाऱ्या शेतीमध्ये पाणी जाऊन शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान होणार आहे. तसेच विकासकाने आपले प्लॉट विकसित करण्यासाठी त्यातील खडक व दगड फोडण्यासाठी विनापरवानगी सुरूंगाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्या गावातील घरांना तडे गेले आहे. म्हणुन आपण प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून दयावा. ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर आम्ही वाफेघर ग्रामस्थ व शेतकरी तीव्र आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल, असे निवेदनात नमूद केले आहे.
वाफेघर ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
भारत फुलपाखरे,
नायब तहसीलदार, पाली-सुधागड