दुचाकीस्वार गंभीर जखमी
। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच ऐन सहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी वाकण-रोहा मार्गावरील आमडोशी गावाजवळील एका वळणावरती दुचाकी आणि टेम्पोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात गुरुवारी (दि. 12) दुपारच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले आहे.
माहीतीनुसार रेवोली (मेढा) येथे आपल्या नातेवाईकांकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले तामसोली गावातील अतुल भिलारे हे आपल्या वडीलांसह दुचाकीवरून दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असतानाच वाकण-रोहा मार्गावरील आमडोशी गावाच्या हद्दीमध्ये एका वळणावरती समोरुन येणारा टेम्पोला समोरासमोर धडक लागून अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार अतुल भिलारे (25) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागोठणे सरकारी रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तर त्यांचे वडील अनंत शांताराम भिलारे (50) हे किरकोळ जखमी झाल्याने उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. याबाबत पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.