। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे येथील घरात चाकूने हल्ला झाला आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडला आहे. हल्ला करून दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेला. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सैफ अली खानच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास चाकूचा जीवघेणा हल्ला झाला आहे. सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफअली खानला आला. आवाज ऐकून तो बाहेर आला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर चाकूने सपासप वार केले. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. त्यानंतर तो चोर पळून गेला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सैफ अली खानच्या मानेला व मणक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, हल्ला कोणी आणि का केला हे समझू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.