रुग्णालयात प्रशासकीय विभागातील 50 टक्के पदे रिक्त; कामाचा निपटारा जलद गतीने होण्यास अडथळे
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील फक्त 50 टक्के कर्मचार्यांच्या भरोवशावर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. परिणामी, कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत असल्याने प्रलंबित कामाचा निपटरा जलद गतीने होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा मुंबई मंडळ, ठाणे येथील आरोग्य सेवा विभागातील उपसंचालकांना पत्र देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही रुग्णालयाची अवस्था कर्मचार्यांअभावी दयनीय आहे. शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेत पदभरती करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी 40 वर्षांपूर्वी अलिबाग शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची बांधणी करण्यात आली. दोनशे खाटांचे असलेल्या या रुग्णालयात ग्रामीण व शहरी भागातून हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या अंतर्गत सहा उपजिल्हा रुग्णालय व नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच नगरपालिका रोहा, पनवेल, खोपोली, माथेरान या रुग्णालयांचे प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रणही या कार्यालयामार्फत केले जाते.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थापना, लेखा, नियोजन, प्रमाणपत्र, भांडार, रोखा शाखा, आवक-जावक असे अनेक प्रशासकीय विभाग कार्यरत आहेत. या विभागांमार्फत तक्रार प्रकरणे, सभांची माहिती, विविध प्रस्ताव तयार करणे, बदली प्रस्ताव, भरती प्रक्रिया, नियमित टपालावर कार्यवाही करणे, तारांकित प्रश्नांची उत्तरे तयार करणे, वेळोवेळी होणार्या सभांची माहिती घेणे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, फिटनेस प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, भांडार पडताळणी, रुग्णालयातील आहार सेवा, सुरक्षा सेवा, स्वच्छता सेवा दैनंदिन किरकोळ खरेदी अशा अनेक प्रकारची प्रशासकीय कामे केली जातात.
जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय विभागातील 20 पदे मंजूर आहेत. त्यापैकी दहा पदे रिक्त असून, दहा कर्मचार्यांच्या भरोवशावर प्रशासकीय कामकाज करावे लागत आहे. प्रशासकीय पदे 50 टक्के रिक्त असल्याने कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत आहे. एका लिपिकाकडे दोन-दोन विभागांचा कार्यभार सोपविला जात आहे. त्यामुळे नियमित कामांबरोबरच प्रशासकीय कामांचा निपटारा जलद गतीने करणे कठीण होऊन बसले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अपुर्या कर्मचार्यांमुळे काही प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करताना विलंब होण्याची शक्यता आहे. कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास कर्मचार्यांना संबंधितांकडून खुलासा विचारला जातो. त्याचा परिणाम म्हणजे वरिष्ठांकडून नाराजीही व्यक्त केली जाते.
कार्यरत कर्मचार्यांना सुट्टीची मागणी केल्यास ती मंजूर करतानाही अडचणी निर्माण होत आहेत. या प्रश्नांबाबत अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपसंचालकांना पत्र देऊन रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही रिक्त पदे भरण्यास शासन उदासीन ठरल्याचे चित्र आहे.
प्रशासकीय अधिकार्यासह दहा पदे रिक्त
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी यांचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकार्यांकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक यांची सहा पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तसेच अभिलेखापाल, लघुटंकलेखक ही तीन पदे अद्यापपर्यंत भरली नाहीत. त्यामुळे कामे करताना कर्मचार्यांना प्रचंड ताण पडत आहे. रुग्णालयात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करीत असताना रिक्त पदांवरही शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांचा आढावा शासनाकडे दर महिन्याला पाठविला जातो. ही पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. अंबादास देवमाने,
शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय