नेहुलीतील क्रीडा संकुलात होणार मतमोजणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान सात मे रोजी पार पडले. मतदानानंतर वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मंगळवारी (दि.4) मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.31) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 60.51 टक्के इतके मतदान झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 66.67 टक्के, पेण 66.67 टक्के, श्रीवर्धन 59.20 टक्के, महाड 57.56 टक्के, दापोली 57.37 टक्के, गुहागर 56.44 टक्के मतदान झाले आहे. आता मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे.
पेण, अलिबाग, दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल लावण्यात येणार असून, मतमोजणीसाठी 27 फेर्या असणार आहेत. श्रीवर्धन व गुहागर मतदारसंघासाठी 14 टेबल असून, 23 फेर्या होणार आहेत. तसेच महाड विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्यात येणार असून, 29 फेर्या होणार आहेत. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची स्वतंत्र मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी दहा टेबल लावले जाणार आहेत. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. मतमोजणीसाठी एक हजार अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल आदींचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्रात मोबाईलला बंदी निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्रातून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. या केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेज कॅलक्युलेटर, इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.