रूग्णांसह नातेवाईक, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी (दि.28) रात्री स्लॅब कोसळण्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी टळली. या रुग्णालयातील दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु, आजही रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय कायमच चर्चेत आहे. रुग्णांना चांगली सेवा न मिळणे, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णालयात न मिळणे, डॉक्टरांची कमतरता, ठिकठिकाणी पार्कींगचा प्रश्न अशा अनेक समस्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय ग्रासलेला आहे. त्यामध्ये आता रविवारी रात्री आणखी एका समस्येची भर पडली आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रसुती पश्चात काळजी कक्ष आणि सर्जिकल वार्डच्या दरम्यान असलेल्या समोरील गेटमधील स्लॅब रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कोसळला. याच गेट जवळून रुग्णांचे नातेवाईक ये-जा करीत होते. यावेळी सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, भला मोठा स्लॅब कोसळल्याने रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. डागडुजी करून रुग्णालयाला चकाचक ठेवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्लॅब कोसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रुग्णालयाची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.







