अलिबागची विरा राज्यात अव्वल

अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावरील अभिनयात प्रथम; 9 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये अंतिम फेरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

छोट्या वयात मोठ्या रंगमंचावर आत्मविश्वासपूर्ण अभिनयाची छाप पाडत अलिबागच्या विरा प्रशांत नरबेकर हिने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. ‌‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेतील हे यश अलिबागच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न बालरंगभूमी परिषद आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, नृत्य व नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत अलिबागच्या विरा प्रशांत नरबेकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरी 9 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणार आहे.

ऐरोली येथील न्यू युरो स्कूलच्या भव्य रंगमंचावर झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट अभिनय, प्रभावी संवादफेक आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर विराने परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. लता पाडेकर आणि कल्पना गोसावी यांनी केले, तर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते रवी वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले, बालरंगभूमी परिषद नवी मुंबईचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के यांनी विराचे कौतुक करून तिला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा पुरस्कार माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. अंतिम फेरीतही सर्वोत्तम सादरीकरण करून अलिबागचे नाव उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.

विरा नरबेकर
Exit mobile version