काढणीला सुरुवात; महिलांच्या हाताला काम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा येथील पांढरा कांदा काढणीला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी काढणीच्या कामाला लागले आहेत. अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याच्या माळी तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. अलिबागच्या पांढर्या कांद्याला पुणे, मुंबई, रत्नागिरी, नवी मुंबई येथून मागणी आली असल्याचे कांदा उत्पादक शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातील पांढर्या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगांव आदी परिसरातील गावांमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यामध्ये सुमारे 300 हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
भात कापणीची कामे पुर्ण झाल्यावर नोव्हेंबरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली होती. आता कांदा तयार झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. कांदा काढणीपासून त्याच्या माळा तयार करण्यासाठी स्थानिक कामगारांना रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे कांदा काढणी, त्याच्या माळा तयार करण्यासाठी महिलांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. कांदा काढणीपासून माळा तयार करण्याचा हंगाम मार्चपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो जणांना उत्पन्नाचा साधन या तीन महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. कांदा लागवडीतून करोडो रुपयांची उलाढाल होते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने कांदा लागवडीवर भर दिला होता. त्यामुळे यावर्षी कांद्याच्या उत्पादन वाढीला गती मिळण्याची शक्यता आहे.
काही शेतकर्यांनी त्यांच्या एक ते दोन एकर जागेत तर काही शेतकर्यांनी दोन ते तीन गुंठे क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली आहे. काहींनी घराच्या बाजूला परसबाग म्हणून कांद्याची लागवड केली आहे. कांदा काढणीच्या कामाला वेग आला असून कांदा सुकवून त्याच्या माळी तयार करण्याचे कामही केले जात आहे. अलिबागचा कांदा चविष्ट व गुणधर्म युक्त असल्याने त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून मागणी असते. या कांद्याला रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई, पुणे येथून मागणी आहे. पहिल्या टप्प्यात एक हजारहून अधिक माळी बाजारात जाण्याची शक्यता आहे.
महिलांना रोजगाराचे दालन खुले
कांदा काढणीपासून माळा तयार करण्यासाठी महिला वर्गाला काम मिळू लागले आहे. साडेतीनशे रुपये प्रमाणे दिवसाची मजूरी महिलांना मिळत आहे. कार्लेसह आजूबाजूच्या गावातील महिला हे काम करीत आहेत. मार्चपर्यंत हे काम सुरु राहणार असल्याने तीन महिने महिलांना रोजगाराचे दालन खुले झाले आहे.
कांद्याचे दर वाढण्याची शक्यता
मजूरीचे वाढते दर, कांदा लागवडीपासून बाजारात पाठविण्यासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पांढर्या कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील कांदयाची माळ तीनशे रुपये दराने विकली जाणार आहे. त्यामुळे यंदा चार माळी मागे एक हजार 200 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत, असे कांदा उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
कार्लेसह आजूबाजूच्या गावातील असंख्य शेतकरी भातशेतीसह पांढर्या कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीतून शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन मिळत आहे. अलिबागमधील पांढरा कांदा चविष्ट व आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे या कांद्याला मागणी प्रचंड आहे. कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने अधिक बाजारात महत्व प्राप्त झाले आहे. त्याची किंमतही यंदा वाढणार आहे. कांदा काढणीला सुुरुवात झाली आहे. 26 जानेवारीपर्यंत कांदा बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
– सतिश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी