पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गुढीपाडव्यासह जयंती उत्सव तसेच वेगवेगळे धार्मिक सण या पंधरा दिवसांच्या कालावधीत आहेत. सण, उत्सव साजरे होत असताना कोणताही वाद होणार नाही, याकडे लक्ष देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलीस सर्वांच्या सोबत असून स्वयंशिस्तीने सण, उत्सव साजरे करावे असे आवाहन अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी केले.
जिल्हयामध्ये 30 मार्च ते 14 एप्रिल या पंधरा दिवसाच्या कालावधीत सण, उत्सव व जयंती सोहळे साजरे केले जाणार आहेत. या निमित्ताने शनिवारी (दि.29) शांतता समितीची बैठक अलिबागमधील पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विनीत चौधरी बोलत होते.
यावेळी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, निवासी नायब तहसीलदार संदिप जाधव, गोपनिय शाखेचे पोलीस हवालदार हर्षल पाटील, मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीचे सर्व पदाधिकारी, सभासद, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित अनेकांनी वाहतूक कोंडी, अतिक्रमण, बेशिस्त वाहन चालकांबाबत प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत पोलीस व महसूल प्रशासनाने आश्वासन दिले.
यावेळी अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी सांगितले की, जिल्हयात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, श्री हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटना व मंडळाच्या वतीने जयंती उत्सव होणार आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांबरोबरच मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या कालावधीमध्ये नागरिकांची गर्दीदेखील प्रचंड होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सण, उत्सव साजरे करीत असताना प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य समजून वाहने योग्य ठिकाणी पार्कींग करावीत. मिरवणूकांच्या दरम्यान अतिउत्साहीपणामुळे वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी व काळोखाचा फायदा घेऊन काही गैरप्रकार होऊ शकतात. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. परंतु प्रत्येक नागरिकांनीदेखील या कालावधीत दुसर्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारचे मोठ्या आवाजाचे वाद्य वाजवू नये. स्वयंशिस्तीने सण, उत्सव, जयंती सोहळे साजरे करा, असे आवाहन विनीत चौधरी यांनी केले.