शांतता कमिटीच्या बैठकीच्या माध्यमातून जनजागृती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील नागरिकांना सण, उत्सव शांततेत साजरे करता यावे यासाठी रायगड पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. ठिकठिकाणी शांतता समितीची बैठक घेऊन सुचना दिल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे चुकीच्या पोस्ट व्हायरल करून राष्ट्रीय एकात्मेला बाधा पोहचण्याचा प्रयत्न करणार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जाणार आहे. जातीय सलोखा बिघडविणार्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मांडव्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोय यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये शांतता समिती सदस्यांची बैठक गुरुवारी (दि.27) घेण्यात आली. या बैठकीत भोय यांनी सदस्यांना सुचना केली. यावेळी त्यांनी सदस्यांना सांगितले की, सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करणार्यावर लक्ष ठेवून अशा लोकांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन समाजात जनजागृती करावी. कोणत्याही घटनेच्या पार्श्वभूमीविषयी संपूर्ण पडताळणी झाल्याशिवाय नागरिकांनी व्यक्त होऊ नये. जनजागृतीसाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे. जातीय सलोखा बिघडवणार्या समाजकंटकाची तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आगामी सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत या दृष्टीने प्रत्येकाने जागृत नागरिक म्हणून काम करावे, अशा सुचना दिल्या.