| जळगाव | प्रतिनिधी |
घरासमोरील पेटत्या शेकोटीत पडून देवांशू सुनील सोनवणे (8 महिने) हा बालक गंभीररीत्या भाजला गेला होता. नऊ दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्हा रुग्णालयात घडली. मृत बालक जळगाव येथे खेळता- खेळता घराबाहेर, पेटत्या शेकोटीवर पडल्याने भाजला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथील सुनील सोनवणे व त्यांच्या पत्नी असे दोघेही शेती काम करतात. आठ महिन्यांपूर्वी त्यांना देवांशू हा मुलगा झाला. तापीनदी काठचे गाव असल्याने थंडीचा कडाका थोडा जास्तच आहे. परिणामी, गल्लीतील तरुणांनी 11 जानेवारी रोजी घरासमोर शेकोटी पेटविलेली हेाती. तेथे काही ग्रामस्थ हात शेकत बसले होते. त्या वेळी देवांशू वॉकरमध्ये खेळत-खेळत तिकडे गेला व त्याचा वॉकरसह तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यापासून ते पोटापर्यंतचा भाग गंभीररित्या भाजला गेला. तसेच पायालाही इजा झाली. घडल्या प्रकाराने एकच धावपळ उडून आई-वडिलांनी तेथे धाव घेत भाजलेल्या बाळाला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत देवांशूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्याला वाचविण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. वैद्यकीय पथकाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना अखेर सोमवारी (दि.20) देवांशूचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.