। उरण । वार्ताहर ।
उरण परिसरात नशेच्या पानाची क्रेझ सुरु आहे. पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणार्या पानांची विक्री खुलेआम होताना दिसत आहे. उरणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग पेडलर्स जाळे पसरलेले आहे. यामुळे गावांमध्ये नशेचा एक अजब प्रकार पाहायला मिळत आहे. तसेच, या पानामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचा मोठा धोका असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
उरणमध्ये ‘नशायुक्त पान’ खाणार्या तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. या पानामध्ये अनेक दारूच्या बाटल्या पिल्यानंतर जेवढी नशा येते तितकी नशा एक पान खाल्ल्यानंतर येते, असे हे पान खाणारे सांगतात. या पानामध्ये किमाम नावाची तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हे नशायुक्त पान कधीही न खाणार्या व्यक्तीने खाल्ले तर त्याला लगेच चक्कर येऊन खाणारी व्यक्ती बेशुद्ध पडते, असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. उरण परिसरात तसेच अनेक गावांमध्ये असे नशायुक्त पान खाण्याचे एक व्यसनच तरुणांमध्ये दिसून येत आहे. पानपट्ट्यांवर दिवसाढवळ्या या तरुणांचा घोळका हमखास दिसून येतो. रात्रीच्या वेळेस या तरुणांमध्ये पान खाण्याची एक स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे. त्यात वापरण्यात येणार्या मादक पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर होण्याची संभावना असते. हळूहळू तोंडाचा आकार देखील लहान होत जातो. तोंडातील त्वचा नाजूक असते. तंबाकूमुळे तोंडामध्ये गाठी तयार होत असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंता वाढली आहे.