। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या पोलीस कॉलनीचे रुपडे पालटले असून जीर्ण झालेल्या वस्तूंची डागडुजी करत या कॉलनीला नवा साज देण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे सेवा देणार्या पोलीस कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
सन.1917 साली कर्जत तालुक्यातील माथेरान येथे हेरिटेज पद्धतीचे पोलीस ठाणे बांधले गेले होते. त्याला लागूनच पोलीस कॉलनीची उभारणी करण्यात आली होती. पोलीसांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी 10 ते 12 खोल्यांची उभारणी केली गेली होती. मात्र, कालांतराने या सर्व खोल्या जीर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. दरम्यान, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी प्रयत्न करून कॉलनीच्या उभारणीसाठी भरघोस निधी आणला होता. मात्र, कोरोनामुळे तो निधी परत गेला. तद्नंतर 2022-23 रोजी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांनी माथेरान पोलिस ठाण्याला नवसंजीवनी दिली. त्यावेळेला दोन ते तीन खोल्यांचे बांधकाम नव्याने करण्यात आले होते. मात्र, बाकीच्या खोल्यांच्या विचार झाला नाही. मात्र, आता येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी पूर्ण कॉलनीसाठी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचे दिसत आहे.