| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग येथील नागाव येथे रविवार दि.9 जुलै रोजी आनंदयात्रीतर्फे उदयोन्मुख शास्त्रीय गायिका कस्तुरी देशपांडे हिच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निसर्गाची देण लाभलेल्या नागाव येथे रोहित वैशंपायन हा युवा, मेहनती हार्मोनियम वादक सांगितिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या परिसरात उत्तम श्रोतावर्ग तयार व्हायला हवा आणि शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी शास्त्रीय गायन वडणाच्या मैफिलिंचे आयोजन तो करतो. रविवारी आईच्या स्मृतीस वंदन म्हणून आनंदयात्री-एक सांगितिक मैफिल या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या अलिबागच्या कस्तुरी हीचे शास्त्रीय गायन आयोजित केले होते.
पंडित अरुण कशाळकर यांची शिष्या असलेल्या कस्तुरी हिने राग नंदने मैफिलीचा प्रारंभ केला. नंद रागाच्या अभ्यासपूर्ण आणि रंजक मांडणीने रसिक त्या रागात तल्लीन झाले. नंद मधली धन धन ही बंदिश रसिक श्रोत्यांना खूपच आनंद देऊन गेली. राग नंद नंतर राग रागेश्री मधील मोरा मन ही बंदिश आणि त्याला जोडून एक सुरेल तराणा उत्तमरीत्या सादर करून कस्तुरीने रसिकांची मने जिंकली. रागेश्री राग सादर केल्यानंतर याद पिया की ही सुप्रसिद्ध ठुमरी सादर करण्यात आली. उत्तम स्वर, रागाची उत्तम मांडणी यामुळे रंगलेल्या मैफिलीची सांगता कस्तुरीने भैरवी गाऊन केली. निनाद जोशी यांनी हार्मोनियमवर तर आदित्य पानवलकर याने तबल्यावर अतिशय समर्पक साथ संगत केली. स्वरसाथ चैत्राली देसाई हिने दिली. या मैफिलीस महेश पेंडसे, अविनाश देव, भालचंद्र देशपांडे, अथर्व देव यांसह अलिबाग परिसरातील अनेक दर्दी संगीत रसिक व कलाकार उपस्थित होते.