वदप आदिवासीवाडीतील अंगणवाडी गेली चोरीला

जागेवर इमारत नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायत मधील वदप आदिवासीवाडी मध्ये बांधण्यात आलेली अंगणवाडी ही चक्क चोरीला गेली आहे. 2020-21मध्ये मंजूर असलेली ही अंगणवाडी इमारत आजपर्यंत बांधण्यात आलेली नाही. मात्र त्या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे जोडण्यात संबंधित ठेकेदार यशस्वी झाला आहे.साडेआठ लाख रुपयांचे हिलाचे धनादेश काढण्यासाठी कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या टेबलापुढे आल्यावर त्या गावात अंगणवाडी प्रत्यक्षात उभीच नाही हे आढळून आले असून हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
वदप ग्रामपंचायतीने 27 मे 2022 रोजी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी बांधण्याचा ठराव केला होता. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने 20 एप्रिल 2022 रोजी आदिवासीवाडी येथे नवीन अंगणवाडी बांधण्यास मंजुरी देण्यात आली.

31 डिसेंबर 2022 रोजी मएसकेजीफ या संस्थेकडून टेस्ट रिपोर्ट देण्यात आला आहे.वदप आदिवासी वाडी मधील अंगणवाडी बांधण्याचा कार्यारंभ आदेश गटविकास अधिकारी यांच्याकडून 10 जून 2022 ला देण्यात आला. तांत्रिक मान्यता मिळाल्यावर खेरमाता सहकारी संस्थेच्या नावावर हे काम मंजूर झाले आणि संबंधित ठेकेदाराने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम कागदोपत्री सुरू केले.त्यानंतर 30 मार्च 2023 रोजी अंगणवाडी इमारत बांधकाम पूर्ण झाले असल्याचे नोंद कर्जत पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गुलाबराव देशमुख यांनी एम बी रेकॉर्ड केली आणि कायदेशीर रित्या साडे आठ लाख रुपयांची अंगणवाडी इमारत पूर्ण झाली असल्याचे पंचायत समिती कडून नोंद झाली. जुलै 2023 मध्ये या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे रेकॉर्ड रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उप अभियंता भिलारे यांच्याकडे पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी सदर अंगणवाडी इमारतीची फाईल पोहचली.त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणी साठी न जाता जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता यांनी पूर्णत्वाचा दाखला देवून टाकला.

फक्त कागदावर असलेली ही अंगणवाडी इमारतीचे साडेआठ लाखाचे बिल अदा करण्यात यावे यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या टेबलवर फाईल पोहचली.मात्र तेथे पंचायत समितीचे शाखा अभियंता देशमुख यांच्याकडून त्या फाईलवर लवकर सही व्हावी यासाठी गटविकास अधिकारी साबळे यांच्याकडे चकरा मारू लागले होते. त्यामुळे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी वदप आदिवासी वाडी मध्ये पोहचले आणि त्यावेळी सरकारी यंत्रणेला धक्का बसला.वदप आदिवासीवाडी मध्ये कुठेही अंगणवडी इमारत आढळून आली नाही.त्यामुळे त्या इमारतीबद्दल शाखा अभियंता देशमुख यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि त्यामुळे त्या कामाचे बिल थांबवून ठेवण्यात आले असून आता गटविकास अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रस्तावात निविदा, कार्यारंभ आदेश, बील, टेस्ट रिपोर्ट, अंगणवाडी इमारतीचे फोटो, कामाला आलेले कामगार यांची यादी असे एकापेक्षा एक महत्वाची कागदपत्रे जोडलेली आहेत, पण प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली असता अंगणवाडी चोरीला गेल्याचे समजते. तरी कर्जत प्रातांधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी (सीईओ), रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक, रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे ही अंगणवाडी शोधून काढणार का? 20 एप्रिल 2022 रोजी मंजुरी देण्यात आलेली अंगणवाडी कुठे गेली?असा प्रश्न निर्माण उभा राहिला आहे.

Exit mobile version