। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील परीटआळी येथे असणार्या पशु वैद्यकीय दवाखान्याची अवस्था दयनिय झाली आहे. हा दवाखाना 70 सालापूर्वी माणगाव तालुका असताना बांधण्यात आला. जवळ पास 50 ते 55 वर्षे झाली आहेत. या वर्षामध्ये माणगावमधून तळा तालुका वेगळा झाला. तरीदेखील या दवाखान्याची परिस्थिती सुधारलेली नाही. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.
तळा डोंगराळ दुर्गम भाग असुन, एकमेव शेती व शेतीपूरक, दुग्ध व्यवसाय असल्याने त्यावेळीच्या कार्यकर्त्यानी स्वतंत्र दवाखाना सुरू केला होता. तालुका होऊन 26 वर्षांचा काळ लोटला असूनही अजून दुर्लक्षीत राहिला आहे. याबाबत अनेकवेळा वृत्तपत्रांच्या माध्यमातून लक्ष वेधले गेले. परंतु, प्रशासनाने कोणतीही दखल घेतली गेली नाही. गळक्या इमारती, पडक्या भिंती व ढासळत्या संरक्षक भिंती, काही ठिकाणी छप्पर शिल्लक नाही अशी स्थिती या दवाखान्याची झाली आहे.
या दवाखान्याबरोबर कर्मचारी वसाहतीचा समावेश केला होता. कर्मचारी राहत ही होते, परंतु अपुर्या सुविधांमुळे व बदलत्या जीवनशैलीत राहता येत नसल्याने कर्मचारी इतर ठिकाणी राहणे पसंत केले. यातच दवाखान्यासाठी पुरेसे संख्या बळ नसल्याने अडचणी तयार झाल्या आहेत.
तळा शहर आणि ग्रामीण भागात पशुधनाची संख्या मोठी आहे. दूध उत्पादनातही सर्वत्र मोठी वाढ झाली आहे. यासाठी शासकीय पशु वैद्यकीय सेवादेखील तत्पर व मजबूत असणे गरजेचे आहे. गेले कित्येक वर्ष पशु वैद्यकीय अधिकारी नव्हते. या समस्येबाबत तालुका समन्वयक समितीत मांडली होती. पण ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती झाली. शासकीय सेवा प्रभावी हवी तशी मिळत नसल्याने अनेकांना खासगी पशुवैद्यकांकडून आपल्या पशुधनावर उपचार करून घ्यावे लागतात, असे येथील शेतकर्यांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. त्यांच्यापर्यंत शासकीय पशु वैद्यकीय सेवा पोचत नाही अशीही स्थिती आहे. लम्पी स्कीन या रोगाने पशुधनास जेरीस आणले असून, यामुळे मोठे पशुधन त्यामुळे मृत्युमुखी पडले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था ही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. यामुळे पशुधनांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि त्यांचे आरोग्य बिघडते.
पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था होण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे जुन्या इमारतींची दुरवस्था दवाखान्यांमध्ये वीज आणि पाण्याची समस्या दवाखान्यांमध्ये औषधीसाठा लस, चारा, औषधे इंजेक्शन ठेवण्यासाठी डिफ्रीझर नाही. दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकार्यांची प्रतीक्षा कक्ष नाही. दवाखान्यांच्या इमारती मोडकळीस येणे कौलारू छप्पर दुरूस्ती, दवाखान्यांच्या इमारतींची देखभाल न होणे पशु वैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था होण्यामुळे होणारे परिणाम पशुधनांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, पशुधनांचे आरोग्य बिघडते, पशुधनांचे मोठे प्रमाणात मृत्यू होतो, शेतकर्यांना दवाखान्यात पशुधन घेऊन जाण्यास कठीणाईचा सामना करावा लागत आहे.
शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तळा तालुका शेतकरी संघटनेने आता पुढाकार घेतला असून तळा येथे पशुवैद्यकीय नवीन इमारत व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. या निवेदनासोबत दवाखान्याचे चित्रे छायांकित फोटोसह पाठवली आहेत. शेतकरी संघटनेच्या वतीने तळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत सचिव कैलास पायगुडे, अॅड.अजय जाडे, गणेश राणे, संतोष काप, सिद्धेश राणे उपस्थित होते. तहसीलदार स्वाती पाटील यांनी शेतकरी संघटनेचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
पशु वैद्यकीय दवाखान्याकडे सरकारचे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे.पत्रकारांनी समस्यांकडे लक्ष वेधूनही स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी,नेते यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे इमारत मोडकळीस आली आहे. त्याचबरोबर येथील वातावरण देखील रोगीट आहे. येथे शासनाने दवाखान्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची गरज आहे. शेती करत असताना शेतकर्यांसाठी पशुधन महत्वाचे आहे. त्याच्यावरच शेतकर्यांचे उत्पन्न अवलंबून आहे शेतकरी संघटनेने याबाबतीत पुढाकार घेतला असून देवेंद्र फडणवीस यांना नवीन इमारत बांधण्यासाठी निवेदन दिले आहे. या निवेदनाचा सरकारकडून सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे.
कैलास पायगुडे,
तळा तालुका शेतकरी संघटना सचिव