। ठाणे । प्रतिनिधी ।
ठामपा हद्दीत एक हजारहून अधिक बांधकामे बेकायदेशीरपणे सुरू असली तरी प्रशासनाकडे 769 अनधिकृत बांधकामांचीच नोंद आहे. विशेष म्हणजे नोंद झालेल्यापैकी फक्त 663 अनधिकृत बांधकामांचीच बीट डायरीत नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी आक्रमक भूमिका घेत बीट डायरीत नोंद असलेली सर्व बेकायदा बांधकामे कोणतेही कारण न देता पूर्णपणे आणि तात्काळ तोडावेत, असे स्पष्ट निर्देश अधिकार्यांना दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरिक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे. ही सर्व बांधकामे, पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरुपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झाले पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील. मात्र, या कामात कोणतीही हयगय होऊ नये, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.