| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर किकवी गावच्या खाली असलेल्या पाणी साठवण बंधाऱ्याची खाली वाढवण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामाला सुरुवात झाली असून, बंधाऱ्याचे वरच्या भागातील माती काढणे आणि दगड फोडून पाण्याचा साठा जास्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बंधाऱ्यात पाण्याचा साठा अधिक प्रमाणात झाल्यास त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांना होणार आहे.
राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 2021 मध्ये चिल्हार नदीवर काही पाणी साठवण बंधारे बांधण्यात आले होते. त्यात किकवी तसेच सुगवे आणि चाफेवाडी येथे बांधण्यात आलेले पाणी साठवण बंधारे यात मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ येऊन साचून राहिला होता. पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहून जाणारे दगड माती ही सिमेंट बंधाऱ्यामुळे तेथेच अडकून पडले आहेत. त्याचा परिणाम बंधाऱ्यातील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली होती. किकवी येथील पाणी साठवण बंधाऱ्याच्या खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे. खोलीकरण करताना बंधाऱ्याच्या वरच्या भागात असलेल दगड फोडणे तसेच गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी मशिनरी आणि ट्रॅक यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे वेगाने कामे सुरू असून पावसाळा सुरू होण्याआधी खोलीकरण कामे करण्याचे जलसंधारण विभागाचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येत आहे.
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
