प्रशासनाच्या नोटीसला शेतमालकांकडून केराची टोपली
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायतीचा घनकचरा भोस्ते ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खेर्डी गावात बेकायदेशीरपणे टाकला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खेर्डी येथील जमीन मालक बदर शहा यांच्या खासगी शेतजमिनीत हा कचरा सातत्याने टाकला जात आहे. ग्रामपंचायतीच्या सूचना व नोटिस नंतरही जमीन मालकाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने या उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या कचऱ्यातून वाहणारे दूषित पाणी आजुबाजूच्या शेतात त्याचप्रमाणे लगतच असलेल्या सार्वजनिक विहिरी जवळून जात आहे. त्यामुळे विहिरीत दूषित पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळी दिवसात आरोग्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनण्याची शक्यता असून या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकाराबाबत खेर्डी येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, भोस्ते ग्रुप ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. भोस्ते ग्रामपंचायतीने या जागेचा पंचनामा केला असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि कचरा तात्काळ हटवण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास खेर्डी गावात रोगराई पसरण्याची भिती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रोगराई पसरण्याची शक्यता
बदर शाह यांनी खेर्डी येथे त्याच्या शेतात आराठी येथील घनकचरा आणून ठेवला आहे. शेतीच्या खालच्या बाजूस आमच्या गावाची सार्वजनिक जलजीवन अंतर्गत असलेली विहीर आहे. त्या विहिरी जवळून कचर्याचे पाणी जात आहे. 29 जून रोजी ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायत भोस्ते येथे पत्रव्यवहार केला. पंचनामा करून ग्रामपंचायतने शाह यांना नोटीस दिली. मात्र तरीही त्यांनी कचरा उचलला नाही. 10 जुलै रोजी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले. अद्यापही कचरा उचललेला नाही. त्यामुळे घनकचऱ्याचे पाणी विहिरीच्या गेल्यास गावात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याचे खेर्डी गावातील गामस्थ प्रवीण प्रकाश मोहिते यांनी सांगितले.







