। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेचा नायब तहसिलदार म्हणून कार्यभार हाती येताच नायब तहसिलदार तुळवे यांनी मनमानी कारभार सुरू केला असून याचा सामान्य जनतेला त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शेकाप कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी पुरवठा शाखेत जाऊन नागरिकांकडून विविध कागदपत्रांची मागणी का केली जात आहे. याचा जाब विचारत शासन आदेश दाखवा अशी मागणी केली.तेव्हा कोणताही शासन निर्णय नसताना रोहा पुरवठा शाखा नायब तहसिलदार यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून आले. नायब तहसिलदार तुळवे हे रोहा तालुक्यातील दिव जमीन घोटाळा प्रकरणात काही काळ सेवेतून निलंबित होते. पुन्हा हजर झाल्यावर त्यांच्याकडे पुरवठा शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे. पुरवठा शाखेचा कार्यभार स्विकारताच या महाशयांनी कोणताही सही शिक्का नसलेला कागद पुरवठा शाखेच्या भिंतीवर लावत रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी कुटुंबप्रमुख फोटो (महिला), कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स यासोबतच मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड, जन्माचा दाखला किंवा मार्कशीट, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांची अडवणूक सुरू केली होती. या सर्व गोष्टी आवश्यक असल्याचा शासन निर्णय दाखवा अशी मागणी जितेंद्र जोशी यांनी करताच शासन निर्णय उपलब्ध नाही. ऑनलाईन करण्यासाठी सदर कागदपत्रे आवश्यक असल्याची माहिती तुळवे यांनी दिली. शिधापत्रिका केवळ शिधा घेण्यासाठी असून अन्य कोणत्याही पुराव्यासाठी नाही. असा स्पष्ट उल्लेख शिधापत्रिकेवर असताना शासनाकडून चालविण्यात येणार्या संकेतस्थळावर नागरिकांची इतर माहिती जमा करण्याचे प्रयोजन काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बोडके यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता राज्य शासनाकडून याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पण रेशनकार्ड ऑनलाईन करताना वरील कागदपत्रे उपलब्ध नसल्यास रेशनकार्ड ऑनलाईन होत नसल्याने अडचणी येत आहेत. याबाबत राज्य शासनाकडे विचारणा केली आहे. पण एनआयसी या संकेतस्थळावर वरील बाबी अनिवार्य केल्याचे मान्य केले आहे असे सांगण्यात आले.