। खोपोली । प्रतिनिधी ।
कलोते येथील आदिवासींची काशीबाई कातकरी, माळूबाई निकम, जनाबाई हिलम, पांडूरंग कातकरी यांची नावे असलेली जागा उद्योजक संजय सोनवणे यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी भाडे तत्त्वावर घेतली होती. तसेच, मोबदला असेल तो देईन असे सांगत परवानगी घेण्यासाठी सह्या अंगठे घेतले. परंतु, कालांतराने भाडेही मिळाले नाही. दरम्यान, दुसर्या एका महिलेच्या नावावर ही जागा करण्यात येत असल्याचा कट आदिवासी शेतकर्यांच्या लक्षात येताच त्यांनी संजय यांना जाब विचारला. मात्र, संजय यांनी दमदाटी केल्याचा आरोप आदिवासी शेतकर्यांनी केला आहे. आदिवासी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश चव्हाण आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवार दि. 28 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी शेतकर्यांच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.