लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माडपच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी सरपंच हरेश पाटील यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन दिले आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माडप ही औद्योगिक विभागातील आहे. सावरोली-खारपडा या मुख्य रस्त्यापासून माडप या गावात जाण्यासाठी अंदाजे दीड कि.मी.अंतर असून, त्यापुढे शंभर घरांची ठाकूरवाडी आहे. त्यांची लोकसंख्या पाचशेपेक्षा जास्त, तर माडप गावची लोकसंख्या बाराशेपेक्षा जास्त आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याची कोणतीच डागडुजी करण्यात आली नाही. या गावाशेजारी मोठे गृह संकुल उभारण्याची योजना सुरू आहे, त्यांच्या बांधकाम साहित्याची ने-आण याच मार्गावरून रात्रंदिवस होत असते.
त्या वाहतुकीचीदेखील भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे या रस्त्याच्या वाईट अवस्थेत आणखी भर पडली आहे. येथून प्रवास करणे हे दुचाकी आणि रिक्षा यांना नकोसा झाला आहे. दुचाकीवरून जाणार्या विद्यार्थ्यांना पालकांनी जाण्यास मज्जाव केला आहे. गाव व त्यापुढील वाडी मोठी असल्याने हा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे, याची त्वरित व कायमस्वरुपी दुरूस्ती करावी, अशी मागणी हरेश पाटील यांनी डॉ. किरण पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे.