बँक ऑफ बडोदाचा कृषी पंधरवडा

विविध उपक्रमांतून दहा कोटींचे कर्ज वितरण

| अलिबाग | प्रतिनिधी |

बँक ऑफ बडोदाच्या कृषी पंधरवडयानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शेतकरी संपर्क अभियाना अंतर्गत अलिबागमधील मेळाव्यात शेतकरी, महिला बचत गट, मत्स्य व्यावसायिक आदींना 10 कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या मेळाव्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.

चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी महाव्यवस्थापक नित्यानंद बेहरा, नवी मुंबई क्षेत्रीय प्रबंधक श्रीनिवास रविपती, उपक्षेत्रीय प्रबंधक हेमंत कुमार लाल, अलिबागच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, बॅकेच्या क्षेत्रीय व्यवसाय विकास प्रबंधक सिल्क स्मिता, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय कुलकर्णी, नाबार्डचे प्रदीप अपसुंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एल. हरळया कृषी उपसंचालक बोरांडे, बँकेच्या नवी मुंबई रीजनचे वित्तीय समावेशन अधिकारी अभय डोंगरे, अलिबाग शाखा प्रबंधक चैतन्य मूड आदी उपस्थित होते.

यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. अटल पेन्शन योजना, जनधन योजना, जीवन सुरक्षा, जीवन ज्योती, सोनेतारण, मत्स्यसंपदा तसेच कृषी पायाभूत सुविधांसाठी कर्ज योजना, महिला बचत गटांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना यांच्या माध्यमातून स्वतःबरोबरच देशाची प्रगती साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला बँक ऑफ बडोदाच्या किसान रथाला नित्यानंद बेहरा यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. हा रथ गावोगावी फिरून केंद्र सरकारच्या व बँकेच्या विविध योजनांची माहिती चित्रफीतीव्दारे देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सहा बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. जिल्हयातील शेतकरी, महिला बचत गट, मच्छिमार या मेळाव्यात सहभागी झाले होते.

महिला बचत गटांचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. महिलांनी एकत्र येत अधिकाधिक बचतगट स्थापन करावेत. या बचत गटांना मिळणाऱ्या कर्जातून व्यवसाय करत स्वतःच्या आणि देशाच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावावा. बँका आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. बँक मित्राच्या माध्यमातून ग्राहकांना ग्रामीण भागात बँकेच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

नित्यानंद बोहरा
महाव्यवस्थापक बँकऑफ बडोदा
Exit mobile version