नारायण वाडेकरांनी जोपसलीय कला
| आपटा | वार्ताहर |
आपटा गावातील मूर्तीकार नारायण धोंडू वाडेकर हे वयाच्या 74 व्या वर्षीसुद्धा कुशलतेने शाडूच्या मातीतून बाप्पाला आकार देत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यात शाडूच्या मातीतून मूर्ती घडविण्याची कला लोप पावत असताना श्री. वाडेकर यांनी ती कला जोपासली आहे. या वयातही त्यांनी चाळीस मूर्ती बनविल्या आहेत.
दरम्यान, यावर्षी पाताळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी त्यांच्या गणपती कारखान्यात दोन वेळा शिरल्याने शाडूची माती भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्यांना कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही. यंदा रंगाची किंमत व शाडूचे भाव वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे आपटा गावातील मूर्तीकार प्रसाद टेंबे यांनी सांगितले. तसेच वाडेकर यांची मुले व परिवारही गणेशमूर्ती बनविण्याचेच काम करतात.