। उरण । वार्ताहर ।
रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या फॅन्सी पिचकार्यांची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे. दूरवर गुलाल उडवणार्या बॅटरीवर चालणार्या पायरो गन विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. ही पिचकारी सेलवरही चालते.
होळीमध्ये विविध रंगांची उधळण करण्यासाठी लहान मुले पिचकारीची आवर्जून मागणी करतात. विविध प्रकारच्या गन स्वरूपातील पिचकारी यंदा बाजारात दाखल झाल्या आहेत. गन पिचकारीमध्ये अल्क गन, वॉटर गन, मशीन गन, ए. के. 47, ओव्हरलोड गन, बाहुबली गन, पंचवटी गन, भोंगा गन, हायड्रोजन पंप अशा पिचकार्यांना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांना ग्राहकांकडून मागणी आहे.
असे आहेत दर गन पिचकारीची किंमत 30 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहे. रंग उधळण्यासाठी अग्निशामक उपकरणाप्रमाणे 4 किलोपासून ते 6 किलोच्या रूपात रंगांची उधळण करणारे सिलिंडर उपलब्ध आहेत. स्पायडर मॅन, छोटा भीम, मोटू पतलू, मिकीमाऊस, अँग्री बर्ड, डीझनी वर्ल्ड, कॅप्टन अमेरिका, फ्रोजन, मुलींसाठी बार्बी प्रिंटवाली पिचकारी मिळत आहे. तसेच, आयपीएल क्रिकेट टीममधील सेलिब्रिटी टीमची प्रिंट असलेल्या पिचकार्यादेखील हातोहात विकल्या जात आहेत.
