। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. भारतात सर्वप्रथम आढळलेल्या आणि नंतर जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा नवा व्हेरिएंट अधिक घातक आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमीक्रोनच्या उगमाबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची माहिती हाती आली आहे.
दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. करोनाच्या या नव्या इ.1.1.529 व्हेरिएंटचं आता जागतिक आरोग्य संघटनेने नावही निश्चित केलं आहे.
पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या करोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेनं सांगितलं की आत्तापर्यंत इ.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा आहे. तसंच ज्यांना आधी करोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.
आत्तापर्यंत अल्फा, बीटा आणि डेल्टा हे व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचं दिसत होतं, ज्याचे परिणाम गंभीर होत होते. या नव्या व्हेरिएंटबद्दल बोलताना थकज च्या मारिया व्हॅन करकोव्ह म्हणाल्या, आम्हाला हे कळत आहे की लोकांना चिंता वाटू लागली आहे. पण त्यातही चांगली गोष्ट अशी की आम्ही जगभरातल्या व्हेरिएंट्सचं निरिक्षण करत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रणाली कार्यान्वित केली आहे. ओमीक्रोन व्हेरिएंटमध्ये वेगाने म्युटेशन्स होत आहेत. त्यामुळे त्या व्हेरिएंटविरोधात लसीची परिणामकारकता शोधायला संशोधकांना काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.