15 लाखांचा मुद्देमाल जप्त
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दादर खाडीत अवैध धंदे सुरूच असून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नेण्यात येणाऱ्या हजारो लिटर डीझलसह पंढरीनाथ शक्ती नावाची बोट जप्त करण्यात आली. एकूण 14 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल पकडला असल्याची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग येथील पोलीस हवालदार राजेश पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, दादर बेडी येथील खोशीमध्ये आरोपी विजय रामनाथ नाईक (42) याने मुंबई येथील विकी, पंडित, मोनुसिंग, इब्बू यांच्या मदतीने विनापरवाना, गैरकायदेशीर सहा हजार लिटर डिझेल चोरून आणून साठा करून ठेवला होता. लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून डिझल जप्त केला.
या कारवाई IND-MH-7-MM-1755 रजिस्टर नंबर असलेली दहा लाख रूपये किंमतीचे 6 सिलेंडर असलेली पंढरीनाथ शक्ती नावाची फायबर बोट, 4,80,000 रूपये किंमतीचे 80 रूपये प्रती लिटर प्रमाणे एकुण 6000 लिटर डिझेल व 30 फुट लांबीचा फायबरचा पाईप असे एकूण 14,80,000 रूपये किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस हवलदार राजेश पाटील, संदीप पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पोलीस नाईक सचिन वावेकर, ईश्वर लांबोटे यांनी व दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली आहे.
कारवाईतला मुद्देमाल म्हणजे हिमनगाचा टोक
गुन्हे अन्वेषण शाखा यांनी दादरच्या खाडीत डिझेल तष्कऱ्यांच्या मुक्या आवळल्या खऱ्या परंतु दैनिक कृषीवलने दादर खाडीमध्ये अवैध् धंदे चालण्याबाबत बातमी प्रसिध्द केली होती. परंतू या बातमीकडे खाकीवाल्यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र आता डिझेल तष्कऱ्यांना पकडल्यावर दैनिक कृषीवलची बातमी खरी होती यावर शिक्कामोर्तब झाले. ही कारवाई एकदाच केली हे दर पंधरा दिवसात ही डिझेलची तष्करी खुलेआम सुरु असून साधारणताः काशाचा खडक या पसिरामध्ये बाहेरून येणाऱ्या मालवाहतुक जहाजांचे कॅप्टन हे या समुद्र चाच्यांशी संपर्कात असतात आणि मग हे समुद्र चाचे हे कॅप्टनच्या मर्जीने मालवाहतुक जहाजांमधून डिझेल काढत असतात आणि त्याची तस्करी दादर वशेणी सुरु आहे जो माल पकडला आहे तो हिमनगाचा टोक आहे. परंतू, खोलवर अनेक होडया अशाप्रकारच्या डिझेल साठवणुक करुन खोश्यांमध्ये लपवून ठेवलेल्या त्यांच्या ही शोध घेणे गरजेचे आहे.