। अलिबाग | प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील दहा ठिकाणी घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरुडमधील घरफोडी झालेली ही दहा घरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होती. नोकरी व्यवसायानिमित्त तेथील मंडळी अलिबाग व मुंबई परिसरात राहत आहेत. ही घरे बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घरात घुसून ऐवज चोरण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मुरुड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका रात्रीत चोरट्याने दहा घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.