| अलिबाग | प्रतिनिधी |
अधिक उत्पन्न मिळवून देणारे वाहक व कमी डिजेल खर्च करणारे चालकांचा पेण व अलिबाग एसटी बस आगारात विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम गुरुवारी (दि.15) मोठ्या उत्साहात पार पडला. पेणच्या आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक व अलिबागचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
रायगड एसटी प्रेमी संघटना व एमएसआरटीसी लव्हर्स ग्रुपतर्फे पेण आगारातील जास्त उत्पन्न आणणारे वाहक व कमी डिझेल खर्च करणारे चालक मोहन कांदे, विनोद म्हात्रे, गोविंद मुचवाड, विशाल भोईर, प्रियंका घार्गे, रेश्मा म्हात्रे, भक्ती म्हात्रे तसेच आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांच्या हस्ते एन. जे. गुठ्ठे, एम. आर. दहिफळे, वैजयंती म्हात्रे, प्रमिला ढेबे यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रायगड एसटी प्रेमी व लव्हर्स ग्रुपचे प्रथमेश वर्तक, कौस्तुभ मोकल, हेमंत पाटील, खंडेराव ललित, आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक, वाहतूक निरीक्षक आलोकगायकवाड, प्राप्ती राखाडे हे उपस्थित होते.
अलिबाग एसटी आगारातील विना अपघात सेवा व डिझेलचा खर्च वाचणारे चालक द्वारकानाथ पाटील, विना प्रवासी तक्रार सेवा, सर्वात्कृष्ट उत्पन्न देणारे वाहक रवींद्र गोंधळी यांचाही आगारात विशेष सत्कार आगाराच्यावतीने करण्यात आला. आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.