म्हसळ्यातील खारगाव बुद्रुक येथील घटना
समाजात विषय न घेता परस्पर पोलिसात तक्रार दिल्याचा राग
। दिघी । प्रतिनिधी ।
समाजातील वाळीत टाकण्याचे प्रकार अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथील कोळी समाजाच्या पुढार्यांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समाजात विषय न घेता परस्पर पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात ठेवून पुढार्यांनी फिर्यादी यांना दंड लावला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची सुरुवात मे 2021 पासून सुरू झालेली. आरोपी किसन आगरकर याने फिर्यादीच्या वहिनीच्या घरी नकळत जाऊन स्वतःच्या भावाविषयी उलटसुलट सांगितले व त्याच्याशी लग्न करशील तर बघून घेईल, असे धमकावले. मात्र त्याला न जुमानता फिर्यादीच्या भावाचे ठरल्याप्रमाणे लग्न झाले. पुढे लग्न झाल्यावर फिर्यादीने तळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, लग्न झाल्याचे समजलेल्या आरोपी किसन याने गावातील पुढार्यांना एकत्र केले व फिर्यादीच्या विरोधात जात पंचायत उभी केली. त्यानंतरदेखील आरोपीने फिर्यादी यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. आपल्या विरोधात समाजात विषय न घेता परस्पर म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली याचा राग मनात ठेवून जातपंचायत पदाधिकारी किसन आगरकर, श्रीरंग वेटकोळी, अरुण वेटकोळी, हिराचंद बसवत, दीपक पाटील, निवृत्ती पाटील, महादेव वेटकोळी, दर्शन आगरकर, द्वारकानाथ पाटील व केशव वेटकोळी यांच्या विरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
आरोपी अद्यापही मोकाट
गुन्हा दाखल होऊन एक आठवडा उलटून गेला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. याबाबतीत फिर्यादी यांनी खंत व्यक्त केली. आजही जातपंचायतचे पुढारी घरासमोरून जाताना नको ते शब्द वापरून मानसिक त्रास देत आहेत, घरावर दगड मारतात, गाडीचे टायर पंक्चर व मोडतोड केली आहे, असे फिर्यादीने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आंतरजातीय विवाह केले म्हणून दंड
चुलत बहिणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचायतीने चुलत्यांना वीस हजार दंड केला. दंड भरल्याशिवाय गावात प्रवेश नाही, असा फतवा काढला होता. त्यावेळी दंड भरल्यानंतर त्यांना समाजात घेण्यात आले. मात्र, सध्या फिर्यादीच्या कुटुंबासह चुलत्यांनादेखील समाजापासून दूर ठेवले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल
सन दाखल गुन्हे
2016 7
2017 3
2018 4
2019 1
2020 1
2021 0
2022 1