आठ गुरे गंभीर, गोठ्याचेही मोठे नुकसान
| खांब-रोहा | वार्ताहर |
शॉर्ट सर्किटमुळे गुरांच्या गोठ्याला आग लागण्याची दुर्दैवी घटना रोहा तालुक्यातील खांब या गावी या घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खांब येथील रहिवासी असलेले व नुकतेच वन विभागातून सेवानिवृत्त झालेले वनाधिकारी शंकर धनावडे यांनी आपल्या राहत्या जागेत तीन-चार वर्षांपूर्वी भाजीपाल्याची शेती, पशुपालन व घरगुती खाणावळ आदी व्यवसायास प्रारंभ केला.
त्यांचे चिरंजीव यांनी पशुपालनातून दुग्धव्यवसाय करून आपल्या व्यवसायात स्थिरावला असतानाच दि.1 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गुरांच्या गोठ्यास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या घटनेत गुरांचा गोठा तर जळून खाक झाला असून, गोठ्यातील आठही गुरे मोठ्या प्रमाणावर भाजली आहेत. यापैकी चार गायी या दुभत्या आहेत. आगीचे वृत्त समजताच अनेक तरूण व ज्येष्ठ नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन व प्रसंगावधान राखून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गुरांना गोठ्यातून काढण्यात यश मिळविले.
या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. तर, शासकीय स्तरावर या घटनेची दखल घेऊन तात्काळ पंचनाम करावा व शेतकर्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.