मध्य रेल्वेने लब्धी गार्डनचे नाव हटविले

। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शनऐवजी लब्धी गार्डन असे एम इंडिकेटरवरून दर्शविले जात होते. ही बाब नेरळ स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी आणि स्थानिकांना सोशल मीडियावरून समजली. त्यानंतर नेरळकरांनी मध्य रेल्वेच्या ट्विटर आणि रेल्वेच्या फेसबुक पेजवर तक्रारींचा भडीमार केला आणि तात्काळ मध्य रेल्वेकडून नेरळ जंक्शन स्थानकाच्या नावापुढे लागलेले लब्धी गार्डन हे नाव हटविले. त्याचवेळी नेरळसह मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या पुढे असलेली बांधकाम साईटची नावे हटविण्यात आली आहेत.

नेरळ रेल्वे स्थानकाच्या नावापुढे नेरळपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका 500 घरांच्या वस्ती असलेल्या बांधकाम साईटचे नाव दाखविण्यात येत होते. मुळात, ती बांधकाम साईट असलेले गाव हे नेरळ ग्रामपंचायतीमध्येदेखील नसल्याने नेरळ गाव आणि परिसरातून संताप व्यक्त केला जात होता. 20 जुलै रोजी सकाळी ही बाबी नेरळकरांना सोशल मीडियावरून समजताच नेरळकरांनी मध्य रेल्वे विरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यात नेरळ प्रवासी संघटना, भिवपुरी प्रवासी संघटना, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि नेरळमधील दर्वेश पालकर, सुमित क्षीरसागर, भास्कर तरे, प्रवीण मोर्गे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन थेट रेल्वेच्या ट्विटरवर तक्रारी केल्या.

दरम्यान, एम इंडिकेटर अ‍ॅपसोबत संध्या देवस्थळे यांनी चर्चा केली आणि मध्य रेल्वेकडून नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक नावापुढील बिल्डरचे नाव काढून टाकण्याची कार्यवाही झाली. त्यानंतर नेरळकरांनी आनंद व्यक्त केला असून कर्जत तालुक्यातील जागरुक प्रवासी यांनी एम इंडिकेटरवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमूळे नेरळ स्टेशन नाही तर मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या नावापुढे लागलेली बिल्डर लॉबीची नावे हटविण्यात आली.

Exit mobile version