वर्षभरापासून दुरुस्ती, डागडुगीचे काम शून्य; ग्रामस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय डागडुगीसाठी एक वर्षापासून हलवण्यात आले आहे. या कार्यालयाचे कामकाज सध्या धामोते येथील लक्ष्मी आयकॉन सोसायटी येथून पाहिले जात आहे. परंतु, वर्ष लोटले तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नेमणूकदेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय हलविण्याचे उद्दिष्ट काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कोल्हारे येथील ग्रामपंचायत कार्यालय एप्रिल 2024 पासून दुरूस्तीच्या नावाखाली धामोते येथील भाड्याच्या दुकानात हलविण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात मुख्य ग्रामपंचायत कार्यालयाच्या डागडुगीचे कुठल्याही प्रकारचे काम सुरू केलेले दिसत नाही. तसेच, अनेक महिने ग्रामसभा घेतली जात नाही. त्यामुळे आमच्या समस्या कश्या प्रकारे मांडायच्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर महारष्ट्रदिनी या ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदनदेखील झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतमधील या बदलामुळे घंटागाडी कचरा घेऊन जात नाही, अशा तक्रारी वारंवार येत आहेत. गावामध्ये घाणीमुळे मच्छरचे प्रमाण वाढले असून कुठल्याही प्रकारची फवारणी केली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच, गटारे साफ न केल्यामुळे त्यात पावसाचे पाणी तुंबून घरांमध्ये शिरून नुकसान होत आहे. त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे नाहिलाजास्तव ग्रामस्थांना पावसाळ्यात आपली घरे सोडून भाड्याच्या घरामध्ये राहायला जावे लागत आहे. अशा अनेक प्रश्नांवर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे वर्ष उलटूनही ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची डागडुगी केली गेलेली नाही. तरीदेखील ग्रामपंचायत कार्यालय दुसरीकडे भाडेतत्त्वावर नेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीतील सामाजिक कार्यकर्ते संदेश हजारे, अनिल गायकवाड, माजी उप सरपंच जयवंत हजारे, योगेश बार्शी, आकाश शिंगे, विजय म्हसकर, कल्पेश कराळे, अमित खाडे, संदेश जोशी, नरेंद्र गोमारे, रुपेश कराळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी एप्रिल महिन्यात ते दुसरीकडे हलविण्यात आले. जुलै 2024 मध्ये या कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, गेले वर्षभर या ठिकाणी कोणतेही दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा उद्देश काय? त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जत पंचायत समितीकडे रीतसर अर्ज केले आहेत.
– संजय विरले, ग्रामस्थ