महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 55 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

| महाड | प्रतिनिधी |

दलितोद्धार चळवळीतील ऐतिहासिक टप्पा ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महाड येथे शुक्रवारी (दि. 20) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चवदार तळे सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. या कामासाठी राज्य शासनाकडून 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून, समतेची क्रांती असल्याचं सांगितलं. समाजातील विषमता आणि जातिभेद दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी उभारलेली ही चळवळ ऐतिहासिक असल्याचं त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचं आवाहन करत महाडमध्ये शिवसृष्टी आणि भीमसृष्टी उभारण्याची मागणी केली.


मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महायुती सरकारच्या काळात शिवसृष्टी आणि भीमसृष्टी उभारण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. आम्ही असे कार्यक्रम कधीच चुकवले नाहीत. त्यामुळे जनतेनं आम्हाला निवडून दिले, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी चवदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी पिण्यायोग्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी दलित समाजाच्या शिक्षणासाठी 1200 कोटींचा निधी, समाजकल्याण विभागात 889 जणांना नोकऱ्या आणि भविष्यात वसतिगृह उभारण्याची घोषणा केली. एकूणच, चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महाडमध्ये इतिहास, राजकारण आणि विकास यांचा संगम पाहायला मिळाला आहे. पुढील वर्षीच्या शताब्दी सोहळ्याची पायाभरणी याच कार्यक्रमातून झाल्याचे चित्र आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते. पोलीस दलामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

Exit mobile version