| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग मतदारसंघातील जनता विकली जाणार नाही, ती नेहमीच शेकापच्या सोबत ठाम आहे. आयुष्य सोपं नाही. शेतीतून पैसे मिळतात, कमाईसाठी मुंबईत जातो आणि कष्ट करून गावाच्या विकासात हातभार लावतात. त्यांना लाल सलाम. तुम्ही हाक मारली, मी साद दिली आहे, तुमचा अधिकार आणि माझे कर्तव्य आहे. माझे काम जनतेने पाहिले आहे. या परिसरातील मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. अलिबाग तालुक्याचा विकास करण्यासठी मी कटिबद्ध आहे. मला विधानसभेत पाठवा, मी अलिबाग-रोहा रस्ता आणि भोनंग-तळवली रस्ता बनविणार आहे. त्यासाठी लागणार निधी शासनदरबारी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
मतांचा जोगवा मागण्यासाठी केवळ आश्वासनांचे गाजर दाखविणार्या आमदाराविरोधात मतपेटीतून आपला संताप व्यक्त करावा आणि ‘शिट्टी’ या चिन्हावर बटण दाबून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला बहुमताने विजयी करा, असे आवाहनदेखील चिऊताईंनी यावेळी मतदारांना केले.
अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, सुभाष वागळे, अशोक खोत, जनार्दन शेळके, अनंत पाटील, बाळू पाटील, नामदेव तांबडकर, नारायण म्हात्रे, रघुनाथ तांबडकर, मारुती म्हात्रे, जयवंत तांबडकर, नवनीत पाटील, महेश वावेकर, श्रीधर वावेकर, रामचंद्र भोईर, दत्तात्रेय भोईर, यशवंत भोईर, मदन तेलगे, विलास चवरकर, वसंत भुरे, अशोक पाटील, शशिकांत खारकर, संदेश वावेकर, राम पाटील, मिलिंद खोत, प्रीती तांबडकर, मोहन धुमाळ, महेश झावरे आदी सुडकोली ग्रामपंचायत परिसरातील गावांमधून शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्त्वांशी कधीच तडजोड करायची नाही, ही शिकवण प्रभू श्रीरामचंद्रांनी दिली. यामुळेच आम्ही अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात विखुरलेल्या मतदारसंघासोबत कायम राहिलो आहोत. विकास साधण्यासाठी निधीची गरज लागते. निधी आणण्यात आपण कधीच कमी पडलो नाही. शेतकरी कामगार पक्षात आपले यश संपादन करून महेंद्र दळवी आणि दिलीप भोईर दुसर्या पक्षात गेले आणि आता शेकापच्या विरोधात उतरले आहेत. त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. आता लाला बावट्याकडे मतदार वळविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे चिऊताई म्हणाल्या.
सत्ताधारी असणार्या महायुतीच्या सरकारला त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी अनेक योजनांची खैरात केली आहे. गावांमध्ये विकासाच्या योजना आल्या; परंतु त्या योजना केवळ कागदावर राहिल्या आहेत. कोट्यवधींचा निधी आणला; परंतु त्याचा फायदा जनतेला नाही तर कंत्राटदारांना झाला आहे. यामुळे आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर महाविकास आघाडीला म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना निवडून देणे ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सुडकोलीचे ज्येष्ठ नेते अनंत पाटील यांनी मांडले.
आ. दळवींवर टीकास्त्र
अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यात विखुरलेल्या मतदारसंघाचा विकास, बेरोजगार तरुणांना रोजगार आणि जनतेला अपेक्षित असणार्या मूलभूत सुविधा पुरविण्यात महायुतीचे आमदार अपयशी ठरले आहेत. केवळ योजनांची खैरात करून जनतेला महागाईच्या खाईत लोटणार्या सत्ताधार्यांच्या धोरणामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. विकास सोडाच, जनतेला विश्वास आणि स्थैर्य न दिल्याने अलिबाग विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर गेला असल्याचे टीकास्त्र महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी आमदार दळवींवर सोडले.