उत्कृष्ट कामगिरी करणार्या कुटुंबांचा होणार सन्मान
| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात एक हजार 830 गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येणार असून, अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, अथवा परसबाग, कंपोस्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरणीसाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन असणार्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 21 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन या चार बाबी वापरात आहेत का, याची माहिती घेणार आहेत. 26 जानेवारी रोजी या कुटुंबांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन पात्र कुटुंबांना गौरविण्यात येईल.
ग्रामीण भागातील सर्व गावात दृश्यमान स्वच्छता राहावी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणार्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गाव स्वच्छ, सुंदर राहण्यास याची मदत होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.