बलात्काराचे गुन्हे 73 टक्के अल्पवयीन मुलींशी निगडीत
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 107 बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील 74 प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणार्या 73 टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी निगडीत आहेत. ही रायगडकरांसाठी चिंताजनक बाब आहे.
महिलांवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. ते निंरतर वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या महानगरापासून अगदी लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती येत आहे.
सन 2019- 20 पर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक 50 गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी 100 गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल होणार्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
2024 मध्ये रायगड पोलीस दलाच्या हद्दीत बलात्काराची 107 प्रकरणे, विनयभंगाची 157 प्रकरणे दाखल झाली. बलात्काराची 107 पैकी 74 गुन्हे हे पॉस्को कायद्याअंतर्गतचे आहेत. म्हणजेच ही सर्व प्रकरणे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराशी निगडीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत एकूण 28 पोलीस ठाणे आहेत. यापैकी 24 पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अलिबाग, कर्जत, खालापूर, रसायनी, पोलादपूर, महाड, म्हसळा, वडखळ आणि गोरेगाव सारख्या ग्रामीण भागातही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
बरेचदा आपली आणि कुटुंबाची बदनामी होईल या भितीने मुलीसमोर येऊन तक्रारी देत नाही. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा अत्याचाराचे प्रमाण जास्त असू शकते. महिला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण हे समाजातील वाढत्या विकृत मनोवृत्तीचे द्योतक आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. पोलीस कारवाई बरोबरच किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
रायगड जिल्ह्यात बलात्काराचे दाखल गुन्हे
2019 : 49
2020 : 58
2021 : 57
2022 : 106
2023 : 100
2024 : 107
पूर्वी बदनामी होईल या भितीने पिडीत मुलगी अथवा तीचे पालक तक्रारीसाठी समोर येत नसत, आता जागृकता वाढल्याने, पिडीत मुली आणि तीचे पालक तक्रारीसाठीसमोर येऊ लागले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पण पोलीस अशा गुन्ह्याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. वर्षभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आम्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली आहेत.
सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड