शिवप्रेमींनी केला परिसर स्वच्छ; राजपुरोहितांकडून गड देवतांचे विधीवत पूजन
। मुुरूड । वार्ताहर ।
शेकडो शिवप्रेमींच्या सहभागाने रविवारी पद्मदुर्ग जागर सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुरूड येथील गड संवर्धन संस्था व कोकण कडा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळीच किल्ल्यावर दाखल होत शिवप्रेमींनी परिसर स्वच्छ केला. त्यानंतर गडावर फुलांची सजावट करण्यात आली. तोरण लावण्यात आले. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले. त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर राजपुरोहितांकडून गड देवतांचे पूजन करण्यात आले.
यावेळी पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर, कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, पुरोहित प्रकाश जंगम, कोकण कडा मित्र मंडळ सदस्य शेखर फरमन, राहुल कासार, संकेत वडके, विजय वाणी, प्रदीप बागडे, महेंद्र मोहिते, मुरूड बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, आकाश मुळेकर आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते. राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन केले, तसेच शिवप्रेमी विजय वाणी यांनी सपत्निक शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेक केला.
गड संवर्धनासाठी निधीची गरज
शिवकालीन शौर्याचे खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी, मल्लखांब, पारंपरिक गोंधळ आदीचे शिवप्रेमींनी सादरीकरण केले. सोहळ्यात महाड, मुरूड शहरासह पंचक्रोशीतील शिवप्रेमी सहभागी झाले होते. जंजिरा किल्ल्यावर गंजलेल्या तोफा व तटबंदीवरील चिर्यांवर रसायनिक मिश्रण वापरून डागडुजी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पद्मदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी आशिलकुमार ठाकूर यांनी केली आहे.
पुस्तकांतून इतिहासाचा मागोवा
मरूत्क्षेत्र ते मुरूड इतिहासाचा पुरातत्त्वीय मागोवा आणि श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग या इतिहास उलगडणार्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मुरूड नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुरूड येथील पुरातत्त्व अभ्यासक प्रीतम वाळंज हिने मरूत्क्षेत्र ते मुरूड इतिहासाचा मागोवा या नावाने, तर मुरूडचेच इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग हे पुस्तक लिहिले आहे.