| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील एका खासगी शिकवणीमधील वादाचे निमित्त होऊन रविवारी (दि.30) शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून नागरिकांनी संयम बाळगावा तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
चार दिवसांपूर्वी अलिबाग शहरातील एका खासगी शिकवणीमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये मुलांनी थोर पुरुषांबद्दल अपशब्द वापरले. परिणामी दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संघटनांचे युवक रविवारी रात्री मोठ्या संख्येने जमले.
घटनेचे गांभीर्य ओळखत अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री आठनंतर सुरु झालेल्या या प्रकारानंतर रायगड पोलीस दलातील सायबर गुन्हे शाखेनेदेखील महत्वाची भुमिका बजावत सोशल मिडीयावर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. थोर पुरुषांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवसेनेचे नेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह काही प्रमुख मंडळींसमवेत पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली.

दरम्यान असंख्य शिवप्रेमींनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जमाव केला होता. लोकप्रतिनिधींच्या मदतीने वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू काही जण ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. अखेर अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बाहेर येऊन जमावाशी संवाद साधला. अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली असून ज्याप्रमाणे रविवारी रात्री सहकार्य केलेत, तसेच आताही सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर पोलीस बळाचा वापर करीत जमावाला तेथून नियंत्रण ठेवण्यात यश आले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी खंबीरपणे भुमिका बजावत होणाऱ्या वादाला आटोक्यात ठेवले.
नागरिकांनी संयम बाळगावा- सोमनाथ घार्गे
अल्पवयीन मुलांनी थोर पुरुषांबद्दल काढलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संपुर्ण कारवाई पुर्ण झालेली आहे. जसा आतापर्यंत संयम दाखविलात तसा संयम यापुढेही आपल्याकडून अपेक्षीत आहे. कोणतीही वादग्रस्त व अक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काहीही आपल्या निदर्शनास आल्यास आपण रायगड पोलिसांशी संपर्क करावा.
अलिबाग मुस्लिम समाजाकडून निषेध
अलिबागमधील काही अल्पवयीन मुलांनी थोर पुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल अलिबाग तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाहिर निषेध व्यक्त केला.

थोर पुरुषांबद्दल अपशब्द बोलण्याची घटना दुर्देवी आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यांच्यावर अजून कलम लावून पुन्हा कोणत्याही महापुरुषांबद्दल असे वक्तव्य करण्यास पुढे येणार आहे. याची काळजी घेऊनच कारवाई होणे गरजेचे आहे.
रघुजीराजे आंग्रे
अलिबागमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांसह प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी संयम बाळगावा.
पंडित पाटील – माजी आमदार
अलिबाग शहरात अनेक जाती धर्माची मंडळी राहतात. अलिबाग शांतताप्रिय शहर आहे. शहरात काल झालेली घटना दुर्दैवी आहे. पोलीसांनी कारवाई केली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा.
प्रशांत नाईक , माजी नगराध्यक्ष