विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

उरण,पनवेल लढवण्याचीही ताकद – महेंद्र घरत
| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी रायगड जिल्हा काँग्रेसने सुरु केली आहे. उरण, पनवेलमध्ये आम्ही लढणारच, असा निर्धारही जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केला आहे.

पनवेल शहर जिल्हा विस्तारित कार्यकारणी नियुक्तीपत्र वाटप व पनवेल तालुका अंतर्गत जिल्हा परिषद गण, पंचायत समिती गटनिहाय पदनियुक्ती बाबत चर्चा तसेच हात से हात जोडो अभियान कार्यक्रमाबाबत नियोजन बैठक पनवेलमधील काँग्रेस भवन येथे शनिवारी (21 जानेवारी) पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना महेंद्र घरत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील व कार्याध्यक्ष आभिजीत पाटील यांनी पदभार स्विकारला. कार्यक्रमादरम्यान पनवेल शहर जिल्हा व तालुका काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते डॉ.भक्तीकुमार दवे, सुदाम पाटील, अभिजीत पाटील, जी आर पाटील, नंदराज मुंगाजी, ए एस पाटील, के एस पाटील, शशिकांत बांदोडकर, श्रुती म्हात्रे, लतीफ शेख, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, ऍड.मदन गोवारी, मोहन गायकवाड, माया अहिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिनाथ गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रताप गावंड व जिल्हा खजिनदार वैभव पाटील यांनी केले.

सकाळी दुसर्‍या पक्षात गेलो होतो आणि संध्याकाळी स्वगृही परतलो. तरीही काँग्रेस पक्षात पुन्हा सन्मानाची जागा देऊन प्रेमही मिळाले. यासाठी समस्त काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. हे प्रेम फक्त काँग्रेसमध्येच मिळू शकते. पनवेलमध्ये काँग्रेस संपली अशी विरोधकांनी टीका केली. मात्र आज सारी काँग्रेसची शक्ती एकवटली असून तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचत आहे. विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही. आम्ही सारे एक आहोत आणि यापुढेही एकदिलाने काम करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनिर्वाचित पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

रायगड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. उरणमध्ये काँग्रेसचा उमेदवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. पनवेलमध्ये सुद्धा निवडणूक लढवण्याची काँग्रेसमध्ये ताकद आहे. पक्षातील ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच महिलांना देखील काँग्रेस पक्षात सन्मानाचे स्थान आहे. – महेंद्र घरत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

Exit mobile version