| पनवेल | प्रतिनिधी |
महानगरपालिकेच्या हद्दीत परिवहन सेवा व्यवस्थित उपलब्ध नसतानाही लाखो रुपयांचा खर्च करून विविध ठिकाणी बसस्टॉप उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बस सेवा नाही, अशा भागातही बसस्टॉप उभे करण्यात आले आहेत. याउलट खांदा वसाहत परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत कामानिमित्त जाणारे नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गर्दी होत असतानाही तेथे बसस्टॉपची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहून वाट पाहावी लागत आहे. या प्रकारामुळे खांदा वसाहतीवर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पालिकेने तातडीने या भागात बसस्टॉप उभारावा, अशी मागणी जोर धरत आहे.







