नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| खोपोली | वार्ताहर |
खोपोली नगरपालिका हद्दीतील शंकर मंदिर तलाव येथे पाताळगंगा नदीमधून पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीमध्ये गगनगिरी मठाच्या बाजूला असणार्या जलवाहिनीत विरेश्वर व लेक व्यूव बिल्डिंगच्या मागील बाजूने येणारे दूषित पाणी व सांडपाणी हे जलवाहिनीच्या गळतीमुळे त्याद्वारे विरेश्वर मंदिर तलावात येत आहे.
यासंदर्भात संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार व पाणीपुरवठा विभागाचे भोईर यांनी दि. 28 फेब्रुवारी रोजी आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली व यातून मार्ग काढण्याचे सांगितले आहे. याशिवाय सदर सांडपाणी हे पाताळगंगा नदीत सोडत असल्याने पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. संपूर्ण शहरास पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती असल्याने सांडपाणी जाणे ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी बाब आहे. संबंधित समस्या त्वरित दूर करावी व नदीत सांडपाणी सोडणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्यावतीने डॉ. शेखर जांभळे व किशोर साळुंखे यांनी केली आहे.